Friday, April 29, 2011

मनाच्या एकांतात (प्रवीण दवणे)

नाच्या एकांतात आपणच आपल्याला विचारत राहतो..."माझ्याच नशिबात का हा छळ? मी तर सर्वांसाठी इतकं केलं; पण तरीही हा भोग माझ्याच आयुष्यात का?'

या अनेक "का?'ची उत्तरं देता आली असती तर आयुष्य एक बेतलेला चित्रपट झाला असता! अनपेक्षितता हेच तर मुळी जीवनाचं स्वरूप आहे. पुढच्या पावलाला नेमकं काय वाढून ठेवलंय, हे माहीत नसणं, हेच जगण्याचं सौंदर्य आहे.

बालपण चिमण्या निरागसतेत निघून जातं. तारुण्यात निसर्गाची सारी ऊर्जा जणू हात जोडून आपल्यापुढं उभी असते. पैसा आणि देहाची रग, यामुळं तरुणपणातील उभारी हेच चिरंतन आयुष्य असा भ्रम याच वयात निर्माण होतो. मस्तीत गर्जना करणाऱ्या वनराजाप्रमाणं तारुण्य स्वतःच्या सामर्थ्यात धुंद असतं. माध्यान्हीचा तळपता सूर्य हलकेच कलतो आणि जगण्याचं पुस्तक आपलं अंतरंग दाखवू लागतं. एकेक पान नवं, काहीसं धक्कादायक. आपली माणसं, आपुलकीचे भास, सुखाची नश्‍वरता, नात्यांचे रेनकोट या पानावर उलगडत राहतात. देहाच्या रंगमंचापलीकडं काळोख्या विंगेत भावनांचं एक छळवादी जग आपल्या चाहुली देऊ लागतं. बॅंकेच्या बॅलन्सनं साऱ्याच आयुष्याचा बॅलन्स सांभाळता येत नाही. हा तोल विचारांच्या भूमीत रुजू लागतो. वस्तूंनी समृद्ध जगापलीकडं जिवलग नात्यांच्या आधाराचीही समृद्धी प्रत्येक पावलाला हवीशी वाटते. तारुण्यात झेपावणाऱ्या पंखांना अनेकदा जे दिसत नाही, ते प्रौढत्वात अडणाऱ्या सांध्यांना दिसू लागतं.

...आयुष्याचं स्वरूप समजावणारे क्षण प्रत्येकाच्या दारावरची बेल वाजवतातच; काही जाणीववंतांना ती ऐकू येते. ते आपला पथ वस्तूंबरोबर भावनांनीही आखतात. मेंदूतील बुद्धिमत्तेला हृदयाच्या संवेदनांची साथ देतात. आपलं भविष्यात येऊ पाहणारं एकाकीपण आधीच सावध होऊन जाणिवांनी उजळतात. आपल्याला निघायचंय त्याच प्रकाशाच्या दिशेनं. त्याचं पहिलं पाऊल ः वर्तमानाचा सहज स्वीकार! ही जितकी वाटते, तितकी सोपी गोष्ट खरंच नाही. वैविध्य हे सृष्टीचं स्वरूप आहे. आपल्या वाट्याला वैविध्याचं नेमकं कोणतं रूप आलं आहे, हे तटस्थपणं जाणून घेतलं पाहिजे. कितीही आदळआपट केली तरी नियतीनं दिलेलं ते दान परत देता येत नाही. दुकानात जाऊन न आवडणाऱ्या रंगांचा कपडा बदलून दुसरा हव्या त्या रंगांचा घ्यावा, तसं कधी होऊच शकत नाही. या रंग-बेरंगांचे असंख्य प्रकार; यादी थोडीच करता येते? पण जरा तिऱ्हाईतपणे आपल्याकडं पाहिलं तर आपलं दुःख कमी वाटावं, अशी केवढी दुःखं अगदी शेजारी उभी असतात! आणि ती जपत माणसं केवढा आनंद साजरा करतात. चेहऱ्यावरून कळणारही नाही एवढं काळजातलं जगणं वेगळं असतं. भोवतालातील हे इतरांचं आयुष्य समजून घेतलं तर आपल्या वेदनेचा स्वीकार करणं काहीसं सोपं होतं.

कपाळावर अश्‍वत्थाम्याची अटळ जखम वाहावी, तसं प्राक्तन प्रत्येकाला एक वेदना देतं, ज्यातून तो जमिनीवर ठाम उभा राहतो; पण त्याच वेळी श्रद्धेचे, संवेदनेचे, नवनिर्मितीचे पंखही प्रत्येकाजवळ असतात. त्या पंखांच्या सोबतीनं अधांतराचं सुखही अनुभवता येतं. हे झोके हेसुद्धा आयुष्याचं स्वरूप आहे. हे ज्याला ऐन तारुण्यात कळतं, तो येणाऱ्या त्सुनामीसाठी आपला तंबू घट्ट रोवून ठेवतो. त्यासाठी मनाला जाणतेपण येण्यासाठी आवश्‍यक असतं परिभ्रमण. केवळ मजेसाठी असतं, ते भ्रमण! पण जाणण्यासाठी केलं जातं ते परिभ्रमण. खरं तर आयुष्य विकसित करणारी ही चेतनामय समाधीसाधनाच असते.
मग कळतं, जग केवळ लेणी, वस्तू, इमारती, डोंगर, झाडं, बर्फाचा पाऊस, डिस्नेनगरी यामुळंच सुंदर नाही, तर या जगाला सौंदर्य देणारी खूप माणसं संस्थारूप कार्य करीत आहेत. वृत्त व छायाचित्रांच्या हद्दीतही न येऊ इच्छिणारी कित्येक माणसं आपले अनेक क्षण दुसऱ्याला सुखी करण्यासाठी उगाळत आहेत. आजच्या स्वयंकेंद्रित जगात होता होईल तेवढं दुसऱ्याचं आयुष्य सुंदर करण्यासाठी जिवाचा आकांत करीत आहेत. कुठं रक्तदान, कुठं अक्षरदान, कुठं समयदान, कुठं संवादसोबत साधत कित्येक एकाकी मनांना उभारी देत आयुष्याला उद्दिष्ट देत आहेत. ही वृत्ती एकाएकी पिकल्या प्रौढपणात निर्माण होत नाही. त्यासाठी विशी-पंचविशीतच पूर्वतयारी करावी लागते. अशी तयारी केलेला शिक्षक फक्त तासापुरताच शिकवणारा कामगार असत नाही. अशी तयारी केलेला वैद्य प्रिस्क्रिप्शनच्या पलीकडं जाऊन रुग्णाला विश्‍वासाची संजीवनी देतो. विधिज्ञ हा दुर्बलाला कायद्याच्या सोबतीनं हक्काची तिजोरी उघडून देतो. एक ना अनेक...क्षमतेला झळाळी येते ती इतरांच्या आयुष्याला आपली कुवत जोडत जाण्यानं. एखाद्या प्रज्ञाचक्षू व्यक्तीला आपल्या डोळ्यांनी पुस्तक वाचून दाखवण्यातला आनंद दृष्टीचे सार्थक करणारा आहे. वैश्‍विक कीर्तीची गायिका सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी जेव्हा गायला उभी राहते, तेव्हा जवानांच्या जखमेला सुरांची फुंकर मिळते; तर स्वर्गीय कलेला "जय हिंद'चा सुगंध!

एकदा का जे "आहे', त्याची सोबत घेऊन ते ज्यांना "नाही', त्यांना द्यावे, या जाणिवेने प्रवास सुरू झाला की होणारा आनंद परमानंद असतो. धरणातलं पाणी वेळोवेळी पाटातून, शेतमळ्यातून झुळझुळत पोचतं, मातीला अंकुर न्‌ तृषेला जीवन देतं, तेव्हाच तर ते संजीवन होतं. नुसतं साठलेलं पाणी जीवन नाही होऊ शकत. प्रवाही पाणी जीवन होतं!

केव्हातरी स्वतःला विचारायला पाहिजे ः माझं जीवन थांबलंय का?
एकाच काठाशी गोठलंय का?
मी इतर मार्गांचा, झडपांचा विचार कधी केलाय का?
स्वतःच्या सुखवस्तू फ्लॅटचं रूपांतर बंद तळघरात तर नाही ना झालं? बाहेरून आत यायला उत्सुक हवेची, प्रकाशाची खिडकी मी का उघडत नाहीए?
ही खिडकी एखाद्या छान पुस्तकाची असेल, मधुर गाण्याच्या ध्ननिफितीची असेल, वसाहतीच्या सांस्कृतिक उपक्रमाची असेल, काम करणाऱ्या घरातल्या सेविकेच्या मुलाच्या शिक्षणाची असेल, समोरच्या घरात दिवसभर एकट्या असणाऱ्या रुग्णाची वा लहान मुला-मुलीची असेल...अशी खिडकी उघडली की, स्वतःच स्वतःला विचारीत छळत ठेवणाऱ्या प्रश्‍नांची सुई बोथट होईल; कदाचित्‌ ती सुई भरतकामाची होईल. जी सुई टोचत नाही, त्याच सुईला रेशमाची लड गुंफली जाईल... न्‌ आपल्या एकाकीपणाच्या उबदार शालीची सोबत समोरच्याचा हिवाळा सुसह्य करील!

ईति.हास

पु.लंचं व्यक्तिचित्र आणि प्रवासवर्णण हे माझ सर्वात आवडतं साहित्य आहे. काळ कुठलाहि असो आणि माणसं आपण पाहिलेली असोत किंवा नसोत ते जिवंत करण्याचं सामर्थ पुलंच्या लिखानात आहे,
त्यांचा आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यातिल एक प्रसंग पुलंच्या " गणगौत" मध्ये वाचण्यात आला आणि तो कधि मनावर कोरल्या गेल्या माझे मला समजले अजुन तो आठवला कि पुलंचं उघड्या डोळ्यांनी पहात असलेले दृष्टेपण अस्वस्थ आणि विचार करण्यास भाग पाडते, ते लिहतात.....
’जिवाला झोंबुन जाणारी घटना हा माझा मित्र अतिशय परिणामकारक शब्दातं सांगतो,पण कलावंताचा विलक्षण अलिप्तपणा राखुण ! ताप आपल्याला चढतो थर्मामिटर नुसता तो दाखवुन स्तब्ध होतो ! रायगडावर जिजामाताची उध्वस्त समाधी आहे.पुरंदरे कारणपरत्वे अनेकदा गेले आहेत. परवा गेले त्याची गोष्ट सांगत होते, परमपुज्य मातु:श्री जिजाबाईसाहेबांच्या समाधी पाशी त्यांना कोल्ह्याकुत्र्यांने फाडलेल्या जनावराच्या हाडाचे सापळे आढळले. आणि त्या समाधी वरुन- समाधी कसली ! आमच्या कोडग्या उपेक्षेची साक्ष देणा~या त्या दगडांच्या राशीवरुन एक लांब लचक धामीण सरपटत गेली.हि कथा एकताना मी शहारलॊ. ज्या पवित्र समाधीवर महाराजांचे पृथ्वीमोलाचे अश्रु सांडले असतील तिथुन स्वतंत्र भारतात एक धामीण सरपटत जाते ! प्रतापगडाच्या अफझूलखानाच्या कबरीपूढे किमती उद उसासत असतो ,जाईच्या कळयाची गलफ तिच्यावर चढते आणि जिजामातेच्या समाधिवर हिंस्त्र श्वापदाने फडश्या पाडलेल्या एकाद्या चुकल्या गोवत्साच्या हाडांचा सांगडा पडलेला आढळतो ! बाबा असलं काहि सांगुन जातो आणि मला स्वत:च्या तोंडात फाडफाड मारुन घ्यावे असे वाटते.
                                                   माणसे ईतिहासातुन खरोखरच घेतात स्फुर्ती ? पुन्हा पुन्हा शिवचरीत्र वाचताना वाटते, महाराजांच्या जन्मापुर्वीचा महाराष्ट्र असाच मेल्या मनाचा नव्हता का? डोळ्यात काहुर ऊठतो.