Tuesday, May 3, 2011

पुलंचे एक प्रेरणादायी पत्र

पुलंचे एक प्रेरणादायी पत्र
पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.
त्याचंच हे उत्तर -

१० जुलै १९५७,
प्रिय चंदू

रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का?

वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.

तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस?

पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.

तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.

पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.

तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही?

तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.

तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!

तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.

तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.

हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?

जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.

तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!

लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.

तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.

My dear boy, whose deaths are justifiable?

माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?

ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.

जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.

तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.

कळावे,

भाई.

Sunday, May 1, 2011

होता एक भुंगा

फ़ार-फार वर्षा पुर्वीची गोष्ट आहे ,पृथ्वी एवढी सुंदर होती कि खुद्द देवालाही आपला स्वर्गलोक फ़िकावाट्त असे .पृथ्वीवर फिरायला येण्याचा मोह स्वत:ला देवालाही आवरत नसे .अश्याचं एका रम्यवेळी देव आणि त्याची देवी एका वनात विहार करत होते. तेवढ्यात देवीला एका तळ्याकाठी निलकमळ दिसते ,श्रावन मासी सकळ पृथ्वीने हिरवाशालू नेसलेला होता त्यात ते फुल म्हणजे सुवासनीच्या नाकातील नथनी प्रमाणेचं . देवीचा हात त्या निलकमळा कडे गेला पण कमळाने त्याला हात लावयचा अधीकार फ़क्त भूंग्याला दिला होता. त्याच्या सोबतचं ते फुलत असे . आपल्या फुलाकडे येणारा हात पाहून भुंगा खवळला........ त्याने काय करावे ? त्याने चक्क देवीला चावा घेतला आणि हे पाहुन देवराघवला.रसुन मग देवी निघुन गेली मग मात्र देवाने वक्रदृष्टी भुंग्यावर फ़िरवली .देव बोलला ’ आता मी तुला शाप देणार , प्राण तुझा तुझे प्रेमचं घेणार ’त्या दिवसा पासून रोज हे घडत आहे त्या शापाने भुंगा मरत आहे.
होता एक भुंगा ,
गुंजन वेडा वनी
होते सर्व काही ,
काही ना कमी जिवनी .
सर्व काही असुनी ,
तो नेहमी असे त्रस्त
एक अनामिक सुगंध,
त्याला नेहमी करे अस्वस्थ .
कोडे त्याचे त्याला सुटेना,
गुढ या ओढिचे काही सुटेना
किती हि टाळले तरी ,
झूरल्या वाचुन त्याला करमेना .
एक दिवस त्याने सुगंधाचा ,
शोध घ्यायचे ठरवले
त्याही सुगंधाने त्या वेड्याला ,
वनभर फ़िरवले .
सरोवराच्या काठी,
भुंग्याला ते फुल दिसले
सोनेरी ते फुलही ,
प्रियकरास पाहून हसले .
सायंकाळी रम्यवेळी,
त्याचे प्रेम फुलले
उजाड त्या वनी ,
जणु स्वर्गचं अवतरले .
बाहुत घेण्यास फुलाने,
हात पसरवला
भुंगाही आपल्या जिवाच्या ,
मिठीत विसावला .
कैफ त्यांच्या प्रेमाचे,
रातीला चढू लागले
जवळ घेउन भुंग्यास ,
फुल मिटु लागले .
मध्यरात्री जेव्हा भुंगा ,
फुलाच्या मिठीत होता झोपला
शाप त्याला गतजन्मींचा ,
त्याला त्या क्षणी आठवला .
जाणिवेने त्या शापाच्या ,
तो वेडावाकडा तडफडला
प्रत्येक श्वास फुलाचा ,
प्राण त्याचे घेऊ लागला .
मरण त्याचे पाहण्यास ,
खुद्द देवचं समोर आला
त्या जिवघेण्या क्षणीही ,
भुंग्याने एक धुंद कटाक्ष दिला.
त्या घायाळ नजरेने,
देवही वरमला
काय करून बसलो हे ,
म्हणुन तो हि शरमला
लाकडॆ फोडण्यासं ज्याला,
निर्सगाने घडवले
भेदु न शकला फुलास,
मार्ग प्रेमाने अडवले.
इजा न व्हावी फुलास ,
म्हणून पडुन राहीला
प्रितीच्या या पंथी त्याने,
आज जिवही वाहिला .
सकाळी जेव्हा फुलास जाग आली
रम्य त्याची दुनीया धुळीत मिळाली
निष्प्राण देह भुंग्याचा जेव्हा मिठीत होता पडला
सांगू काय जिव फुलाचा तेव्हा केवढयाने आक्रोशला
विश्व त्याचे प्रेमाचे,
एका दिवसात मिटले
कधी नव्हे ते फुल,
देवावर संतापले.
सोनेरी ते फुल कोमेजू लागले
क्षणात त्यानेही प्राण त्यागले
रोज मध्यरात्री देव आपल्या कृतीवर रडतो
धरणी अश्रुंचा सडा सकाळी दवबिंदुत पडतो

……………रंग माझा वेगळा
पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका,
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे,
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका,
अंध प्रथांच्या कुजट कोटरी दिवाभितासम दडू नका

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा,
एकविसावे शतक समोरी, सोळाव्यास्तव रडू नका

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे,
करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा,
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटम्बना,
कणभर त्यांच्या मार्ग अनुसर वांझ गोडवे गाऊ नका

सत्ता तारक सुधा असे पण सूरही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे,
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका
- कुसुमाग्रज

Friday, April 29, 2011

मनाच्या एकांतात (प्रवीण दवणे)

नाच्या एकांतात आपणच आपल्याला विचारत राहतो..."माझ्याच नशिबात का हा छळ? मी तर सर्वांसाठी इतकं केलं; पण तरीही हा भोग माझ्याच आयुष्यात का?'

या अनेक "का?'ची उत्तरं देता आली असती तर आयुष्य एक बेतलेला चित्रपट झाला असता! अनपेक्षितता हेच तर मुळी जीवनाचं स्वरूप आहे. पुढच्या पावलाला नेमकं काय वाढून ठेवलंय, हे माहीत नसणं, हेच जगण्याचं सौंदर्य आहे.

बालपण चिमण्या निरागसतेत निघून जातं. तारुण्यात निसर्गाची सारी ऊर्जा जणू हात जोडून आपल्यापुढं उभी असते. पैसा आणि देहाची रग, यामुळं तरुणपणातील उभारी हेच चिरंतन आयुष्य असा भ्रम याच वयात निर्माण होतो. मस्तीत गर्जना करणाऱ्या वनराजाप्रमाणं तारुण्य स्वतःच्या सामर्थ्यात धुंद असतं. माध्यान्हीचा तळपता सूर्य हलकेच कलतो आणि जगण्याचं पुस्तक आपलं अंतरंग दाखवू लागतं. एकेक पान नवं, काहीसं धक्कादायक. आपली माणसं, आपुलकीचे भास, सुखाची नश्‍वरता, नात्यांचे रेनकोट या पानावर उलगडत राहतात. देहाच्या रंगमंचापलीकडं काळोख्या विंगेत भावनांचं एक छळवादी जग आपल्या चाहुली देऊ लागतं. बॅंकेच्या बॅलन्सनं साऱ्याच आयुष्याचा बॅलन्स सांभाळता येत नाही. हा तोल विचारांच्या भूमीत रुजू लागतो. वस्तूंनी समृद्ध जगापलीकडं जिवलग नात्यांच्या आधाराचीही समृद्धी प्रत्येक पावलाला हवीशी वाटते. तारुण्यात झेपावणाऱ्या पंखांना अनेकदा जे दिसत नाही, ते प्रौढत्वात अडणाऱ्या सांध्यांना दिसू लागतं.

...आयुष्याचं स्वरूप समजावणारे क्षण प्रत्येकाच्या दारावरची बेल वाजवतातच; काही जाणीववंतांना ती ऐकू येते. ते आपला पथ वस्तूंबरोबर भावनांनीही आखतात. मेंदूतील बुद्धिमत्तेला हृदयाच्या संवेदनांची साथ देतात. आपलं भविष्यात येऊ पाहणारं एकाकीपण आधीच सावध होऊन जाणिवांनी उजळतात. आपल्याला निघायचंय त्याच प्रकाशाच्या दिशेनं. त्याचं पहिलं पाऊल ः वर्तमानाचा सहज स्वीकार! ही जितकी वाटते, तितकी सोपी गोष्ट खरंच नाही. वैविध्य हे सृष्टीचं स्वरूप आहे. आपल्या वाट्याला वैविध्याचं नेमकं कोणतं रूप आलं आहे, हे तटस्थपणं जाणून घेतलं पाहिजे. कितीही आदळआपट केली तरी नियतीनं दिलेलं ते दान परत देता येत नाही. दुकानात जाऊन न आवडणाऱ्या रंगांचा कपडा बदलून दुसरा हव्या त्या रंगांचा घ्यावा, तसं कधी होऊच शकत नाही. या रंग-बेरंगांचे असंख्य प्रकार; यादी थोडीच करता येते? पण जरा तिऱ्हाईतपणे आपल्याकडं पाहिलं तर आपलं दुःख कमी वाटावं, अशी केवढी दुःखं अगदी शेजारी उभी असतात! आणि ती जपत माणसं केवढा आनंद साजरा करतात. चेहऱ्यावरून कळणारही नाही एवढं काळजातलं जगणं वेगळं असतं. भोवतालातील हे इतरांचं आयुष्य समजून घेतलं तर आपल्या वेदनेचा स्वीकार करणं काहीसं सोपं होतं.

कपाळावर अश्‍वत्थाम्याची अटळ जखम वाहावी, तसं प्राक्तन प्रत्येकाला एक वेदना देतं, ज्यातून तो जमिनीवर ठाम उभा राहतो; पण त्याच वेळी श्रद्धेचे, संवेदनेचे, नवनिर्मितीचे पंखही प्रत्येकाजवळ असतात. त्या पंखांच्या सोबतीनं अधांतराचं सुखही अनुभवता येतं. हे झोके हेसुद्धा आयुष्याचं स्वरूप आहे. हे ज्याला ऐन तारुण्यात कळतं, तो येणाऱ्या त्सुनामीसाठी आपला तंबू घट्ट रोवून ठेवतो. त्यासाठी मनाला जाणतेपण येण्यासाठी आवश्‍यक असतं परिभ्रमण. केवळ मजेसाठी असतं, ते भ्रमण! पण जाणण्यासाठी केलं जातं ते परिभ्रमण. खरं तर आयुष्य विकसित करणारी ही चेतनामय समाधीसाधनाच असते.
मग कळतं, जग केवळ लेणी, वस्तू, इमारती, डोंगर, झाडं, बर्फाचा पाऊस, डिस्नेनगरी यामुळंच सुंदर नाही, तर या जगाला सौंदर्य देणारी खूप माणसं संस्थारूप कार्य करीत आहेत. वृत्त व छायाचित्रांच्या हद्दीतही न येऊ इच्छिणारी कित्येक माणसं आपले अनेक क्षण दुसऱ्याला सुखी करण्यासाठी उगाळत आहेत. आजच्या स्वयंकेंद्रित जगात होता होईल तेवढं दुसऱ्याचं आयुष्य सुंदर करण्यासाठी जिवाचा आकांत करीत आहेत. कुठं रक्तदान, कुठं अक्षरदान, कुठं समयदान, कुठं संवादसोबत साधत कित्येक एकाकी मनांना उभारी देत आयुष्याला उद्दिष्ट देत आहेत. ही वृत्ती एकाएकी पिकल्या प्रौढपणात निर्माण होत नाही. त्यासाठी विशी-पंचविशीतच पूर्वतयारी करावी लागते. अशी तयारी केलेला शिक्षक फक्त तासापुरताच शिकवणारा कामगार असत नाही. अशी तयारी केलेला वैद्य प्रिस्क्रिप्शनच्या पलीकडं जाऊन रुग्णाला विश्‍वासाची संजीवनी देतो. विधिज्ञ हा दुर्बलाला कायद्याच्या सोबतीनं हक्काची तिजोरी उघडून देतो. एक ना अनेक...क्षमतेला झळाळी येते ती इतरांच्या आयुष्याला आपली कुवत जोडत जाण्यानं. एखाद्या प्रज्ञाचक्षू व्यक्तीला आपल्या डोळ्यांनी पुस्तक वाचून दाखवण्यातला आनंद दृष्टीचे सार्थक करणारा आहे. वैश्‍विक कीर्तीची गायिका सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी जेव्हा गायला उभी राहते, तेव्हा जवानांच्या जखमेला सुरांची फुंकर मिळते; तर स्वर्गीय कलेला "जय हिंद'चा सुगंध!

एकदा का जे "आहे', त्याची सोबत घेऊन ते ज्यांना "नाही', त्यांना द्यावे, या जाणिवेने प्रवास सुरू झाला की होणारा आनंद परमानंद असतो. धरणातलं पाणी वेळोवेळी पाटातून, शेतमळ्यातून झुळझुळत पोचतं, मातीला अंकुर न्‌ तृषेला जीवन देतं, तेव्हाच तर ते संजीवन होतं. नुसतं साठलेलं पाणी जीवन नाही होऊ शकत. प्रवाही पाणी जीवन होतं!

केव्हातरी स्वतःला विचारायला पाहिजे ः माझं जीवन थांबलंय का?
एकाच काठाशी गोठलंय का?
मी इतर मार्गांचा, झडपांचा विचार कधी केलाय का?
स्वतःच्या सुखवस्तू फ्लॅटचं रूपांतर बंद तळघरात तर नाही ना झालं? बाहेरून आत यायला उत्सुक हवेची, प्रकाशाची खिडकी मी का उघडत नाहीए?
ही खिडकी एखाद्या छान पुस्तकाची असेल, मधुर गाण्याच्या ध्ननिफितीची असेल, वसाहतीच्या सांस्कृतिक उपक्रमाची असेल, काम करणाऱ्या घरातल्या सेविकेच्या मुलाच्या शिक्षणाची असेल, समोरच्या घरात दिवसभर एकट्या असणाऱ्या रुग्णाची वा लहान मुला-मुलीची असेल...अशी खिडकी उघडली की, स्वतःच स्वतःला विचारीत छळत ठेवणाऱ्या प्रश्‍नांची सुई बोथट होईल; कदाचित्‌ ती सुई भरतकामाची होईल. जी सुई टोचत नाही, त्याच सुईला रेशमाची लड गुंफली जाईल... न्‌ आपल्या एकाकीपणाच्या उबदार शालीची सोबत समोरच्याचा हिवाळा सुसह्य करील!

ईति.हास

पु.लंचं व्यक्तिचित्र आणि प्रवासवर्णण हे माझ सर्वात आवडतं साहित्य आहे. काळ कुठलाहि असो आणि माणसं आपण पाहिलेली असोत किंवा नसोत ते जिवंत करण्याचं सामर्थ पुलंच्या लिखानात आहे,
त्यांचा आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यातिल एक प्रसंग पुलंच्या " गणगौत" मध्ये वाचण्यात आला आणि तो कधि मनावर कोरल्या गेल्या माझे मला समजले अजुन तो आठवला कि पुलंचं उघड्या डोळ्यांनी पहात असलेले दृष्टेपण अस्वस्थ आणि विचार करण्यास भाग पाडते, ते लिहतात.....
’जिवाला झोंबुन जाणारी घटना हा माझा मित्र अतिशय परिणामकारक शब्दातं सांगतो,पण कलावंताचा विलक्षण अलिप्तपणा राखुण ! ताप आपल्याला चढतो थर्मामिटर नुसता तो दाखवुन स्तब्ध होतो ! रायगडावर जिजामाताची उध्वस्त समाधी आहे.पुरंदरे कारणपरत्वे अनेकदा गेले आहेत. परवा गेले त्याची गोष्ट सांगत होते, परमपुज्य मातु:श्री जिजाबाईसाहेबांच्या समाधी पाशी त्यांना कोल्ह्याकुत्र्यांने फाडलेल्या जनावराच्या हाडाचे सापळे आढळले. आणि त्या समाधी वरुन- समाधी कसली ! आमच्या कोडग्या उपेक्षेची साक्ष देणा~या त्या दगडांच्या राशीवरुन एक लांब लचक धामीण सरपटत गेली.हि कथा एकताना मी शहारलॊ. ज्या पवित्र समाधीवर महाराजांचे पृथ्वीमोलाचे अश्रु सांडले असतील तिथुन स्वतंत्र भारतात एक धामीण सरपटत जाते ! प्रतापगडाच्या अफझूलखानाच्या कबरीपूढे किमती उद उसासत असतो ,जाईच्या कळयाची गलफ तिच्यावर चढते आणि जिजामातेच्या समाधिवर हिंस्त्र श्वापदाने फडश्या पाडलेल्या एकाद्या चुकल्या गोवत्साच्या हाडांचा सांगडा पडलेला आढळतो ! बाबा असलं काहि सांगुन जातो आणि मला स्वत:च्या तोंडात फाडफाड मारुन घ्यावे असे वाटते.
                                                   माणसे ईतिहासातुन खरोखरच घेतात स्फुर्ती ? पुन्हा पुन्हा शिवचरीत्र वाचताना वाटते, महाराजांच्या जन्मापुर्वीचा महाराष्ट्र असाच मेल्या मनाचा नव्हता का? डोळ्यात काहुर ऊठतो.